गोवरी (चंद्रपूर) : वेकोली कोळसा खाणीत शेती अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता राजुरा तालुक्यातील साखरी, वरोडा, निमनी, पोवनी, गोवरी, चिंचोली येथील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात भर दुपारच्या उन्हात तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, वेकोली अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी वेळोवेळी अन्याय व अपमान झाल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांच्या आक्रोशाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. यावेळी ॲड. चटप यांनी सर्व नागरिकांना शांत करीत अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. अखेर पंधरा दिवसांत सर्व समस्या सोडविणार असल्याचे वेकोली अधिकाऱ्यांनी सांगितले. जर पुन्हा यात हयगय झाली तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
या आंदोलनात शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनामुळे चार तास वेकोलीची कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. वेकोलीच्या क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुलय्या व उपकार्मिक व्यवस्थापक शैलेश माटे यांनी आंदोलकांपुढे उपस्थित होऊन येत्या पंधरा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकरी व महिला यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
आंदोलनात रवी गोखरे, मदन सातपुते, कपिल ईद्दे, कवडू पोटे, मधुकर चिंचोलकर, दत्तू ढोके, संजय करमनकर, दिलीप देठे, हरिश्चंद्र आवारी, साखरी सरपंच प्रणाली मडावी, पोवनी सरपंच पांडुरंग पोटे, चार्ली सरपंच सुरेंद्र आवारी, गोयेगाव सरपंच बंडू कोडापे, निमणी सरपंच अतुल धोटे, बाखर्डी सरपंच अरुण रागीट, उपसरपंच संतोष डोंगे, विजय मिलमिले, गणेश रोगे,गणपत अडवे, पंढरी घटे, विठ्ठल पाल, सचिन कुडे, गणेश रोगे, मारोती लांडे आदी सहभागी झाले होते. राजुराचे ठाणेदार योगिराज पारधी, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे, उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
पोवनी २ व पोवनी ३ या कोळसा खाणीकरिता भूसंपादन केलेल्या व शिल्लक राहिलेल्या सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला द्यावा आणि या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वारसांना तत्काळ नोकरीचे आदेश द्यावे. परिसरातील काही गावांतील शिल्लक राहिलेली जमीन भूसंपादित करण्यात यावी, कोळसा खाण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकरीत अग्रक्रमाने समाविष्ट करावे.