जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासावरोरा : धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना धरणाच्या बुडीत जमिनी वहिवाटीकरिता देण्यात येते. परंतु या जमिनीवर धरणग्रस्तऐवजी इतर शेतकरी जमीन वाहिती करुन पिक घेत आहे. त्यामुळे शासनाला महसूल मिळत नाही. अशा गाळपेर जमिनी धरणग्रस्त श्ेतकऱ्यांना मिळाव्यात, याकरिता जमीन वाटपाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीत पाटबंधारे विभागास दिले आहे.वरोरा तालुक्यातील चारगाव धरणामध्ये आकोला, राळेगाव, उमरी, चारगाव, गिरोला, बोरगाव, पारडी, सावरी आदी गावातील शेकडो हेक्टर जमिनी गेल्या. धरणातील पाणी कमी झाल्यावर शिल्लक असलेल्या गाळपेर जमिनीचे वाटप धरणग्रस्त शेतकऱ्यांना केले जाते. यामध्ये शासन भूभाडे आकारत असल्याने शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. परंतु मागील काही वर्षापासून धरणग्रस्त शेतकरी गाळपेर जमिनी वाहितीकरिता मागत आहे. परंतु या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन शेती करीत असल्याने धरणग्रस्त शेतकरी गाळपेर जमिनीपासून वंचित राहत आहे. गाळपेर जमिनी मिळाव्या, याकरिता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना साकडे घालण्यात आले होते. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी धरणग्रस्त व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये कायमस्वरूपी उपलब्ध होणारी जमीन धरणग्रस्तांना दहा वर्षाकरिता भाडेतत्वार देण्यात यावी. जसजसे धरणातील पाणी कमी होईल त्यानुसार प्राधान्य क्रमाने धरणग्रस्तांना भाडे तत्वावर जमीन देण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बैठकीत दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढणारचारगाव धरणातील गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन पिके घेण्यात येत आहे. त्यामुळे धरणग्रस्तांना जमिनी मिळत नसल्याने शासनाला महसुलापासून मुकावे लागत आहे. सदर जमिनीवरौल अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढण्यात यावे, असे निर्देशही सदर बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनवणे, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.एच. महाल्ले, शाखा अभियंता आर. एम. कोरडे, तर धरणग्रस्त शेतकरी सदाशिव उमरे, शामदेव उमरे, रामचंद्र उमरे, पाडुरंग उमरे, तुळशिराम बोथले उपस्थित होते.
गाळपेर जमीन वाटपाचे प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठवा!
By admin | Published: April 08, 2017 12:40 AM