लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळविण्यात अन्य घटकांसोबतच मोठा वाटा असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही मोठा वाटा आहे. मात्र, या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा झडत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी धसका घेतल्याची कुजबुज जिल्हाभरात सुरू झाली आहे. यासंदर्भात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लॉन्च केली. परिणामी, चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतही ही बहुचर्चित योजना गेमचेंजर ठरणार, असा दावा सत्ताधारी पक्षाचे समर्थक करीत होते. ही योजना अमलात आणण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार, प्रशासनानेही मोठी तत्परता दाखविली. जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. विधानसभा निवडणुकीत ही योजना महत्त्वपूर्ण ठरली. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
जानेवारी, जुलै की भाऊबीज ?आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीप्रसंगी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भूमिका मांडल्याने महिलांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यात आमदार मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू, महिलांना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये अशी वाढवली नाही तर आमची प्रतिमा खराब होईल. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने धुळीस मिळू देणार नाही. सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. गतवर्षी भाऊबीजेच्या दिवशी योजना लागू झाली. त्यामुळे पुढील वर्षी भाऊबीजेपासून ही रक्कम वाढवू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
पाच हप्ते मिळाले, पुढचे काय? मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते ७ हजार ५०० रुपये खात्यात जमा झाले. जुलै व। ऑगस्ट महिन्यांचा पहिला अन् दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. दरम्यान, आचारसंहिता लागू होण्याअगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीतच खात्यात जमा केले आहेत. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेचे पैसे दीड हजार रुपयां- वरून २ हजार १०० रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचा दणदणीत विजय झाला.
या अटींची सुरू झाली चर्चा लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का? कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? विधवा, परित्यक्ता, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतला जातो आहे का? असे निकष तपासून लाडक्या बहिणींची यादी तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली. प्रकारचे निकष लावले, तर जिल्ह्यात लाभार्थी महिलांची संख्या कमी होऊ शकतो.
विधानसभानिहाय महिला चंद्रपूर - ९३६१० वरोरा - ६७७२५ब्रह्मपुरी - ९४०३२राजुरा - ९१८९८चिमूर - ७२०३३बल्लारपूर - ६६६९९