चंद्रपूर : जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक मिळाले. निसर्गात वन्यजीवांचेही स्थान आहे. त्यामुळे केंद्र सरकार पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभूत विकासासाठी काम करीत. मात्र, आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी केले. राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपुरातील वन अकादमीत ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सचिव व अतिरिक्त महानिदेशक एस.पी. यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, महाराष्ट्राचे वनबलप्रमुख डॉ. वाय.एल.पी. राव, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक उपस्थित होते. ना. यादव म्हणाले, केंद्र सरकार व्याघ्र व आदिवासींचे संरक्षण, जैवविविधता, जलवायू संरक्षणात भरीव काम करीत आहे. जगातील ७५ टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात ५२ व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहेत. यापैकी १७ प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. वन विभागाने वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी फील्डवर जाऊन काम करावे, असेही त्यांनी सूचना केली.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा, वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.