लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात गांधी चौकात चूली पेटवून हातावर भाकरी थापत, थाळी वाजवून गॅस दरवाढीचा तसेच केंद्र सरकारचा निषेध केला. गॅस सिलिंडरच्या दरात मागील दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना केंद्र सरकार दिलासा देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करून त्यांची गळचेपी करत असल्याचा आरोप जिल्हा अध्यक्ष बेबी उईके यांनी केला. रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद करण्यात आल्याने ७० रुपये प्रतिलिटरने रॉकेलची खरेदी करावी लागत आहे. त्यातही अनुदानित सिलिंडरची संख्या कमी करुन दरवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे चूल पेटवून हातावर भाकरी थापत केंद्रसरकारचा निषेध करुन दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, डी. के. आरिकर, मितेश मानकर, दिलीप रिगणे, जिल्हासचिव हर्षा खैरकर, जिल्हा सहसचिव शोभा घरडे, शाहजादी अन्सारी, अर्चना बुटले, राणी रॉय, श्वेता रामटेके, सरस्वती गावंडे, नंदा शेरकी, सुमित्रा वैद्य, नीलिमा नरवडे आदी उपस्थित होते.