चंद्रपूर : सततच्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. वाढत्या सिलिंडर वाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने शेणाच्या गोवऱ्या पाठवून केंद्र सरकार निषेध करण्यात आला. यापूर्वीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. नुकतीच सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. सात वर्षांत सिलिंडरची किंमत ४१० रुपयावरून ८८४ रुपयांवर पोहोचली. सात वर्षांत दुपट्टीने झालेली सिलिंडर दरवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनी आदिमानवासारखे कंदमुळे खाऊन जगायचे का? असा सवाल महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी केला. हे आंदोलन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके, शहराध्यक्ष सुनीता नरडे, तालुका अध्यक्ष सुशीला टेलमोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, वीजेएटी सेलच्या विदर्भ अध्यक्ष रंजना पार्शिवे, माजी नगराध्यक्ष जनाबाई पिपळशेंडे, माजी नगरसेविका लता हिवरकर, साखरकर, मडावी आदी उपस्थित होते.