चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. मागील वर्षात शिक्षक संघटनेने प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांविरोधात जिल्हा परिषदच्या समोर २३ दिवस आंदोलन केले होते. परंतु, समस्या सुटल्या नाही. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राथमिक शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी संघटनेबरोबर चर्चा करण्याचे निर्देश दिले. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याऐवजी २२ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून शिक्षकांच्या कोणत्याही समस्या प्रलंबित नाही. व शिक्षक हे एजंटमार्फत समस्या घेऊन येतात. अशा प्रकारचे परिपत्रक काढले. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा अपमान झाला आहे. त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेनी या वक्तव्याचा तसेच शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध केला. तसेच शिक्षक संघटना शिक्षणाधिकाऱ्यांची येथून बदली करावी, अशी मागणी नामदार बच्चू कडू यांच्याकडे करणार असल्याचे प्रहार शिक्षक संघटनेचे सरचिटणी विनोद लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
शिक्षक संघटनेतर्फे ‘त्या’ वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:21 AM