लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे १२ व १३ जून रोजी सर्वपक्षीय धरणे व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘किसान क्रांती’ नाशिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यातही सगळ्या राजकीय, सामाजिक व शेतकऱ्यांच्या संघटनेमार्फत विशाल धरणे आंदोलन पंधराही तालुक्यात घेण्यात येणार होते. जिल्ह्यातील शेतकरी व त्यांचे समर्थक या आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी होणार होते.शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची व सुकाणू समितीच्या सदस्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी करण्यात आली असून व इतर मागण्या बाबत शासनाने तात्वीक मान्यता दिली आहे. याबाबतीमध्ये संपूर्ण निर्णय २६ जुलै पूर्वी घेण्यात येईल व ते सकारात्मक राहील, याची ग्वाही ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही निर्णय झालेला आहे. त्यामुळे सदर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आणि भाजीपाला व दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी देशात पहिल्यांदाच केलेल्या संपामुळे राज्य सरकाराने नांगी टाकली आहे. शेतकऱ्यांची शक्ती काय असते, हे राज्यातील शेतकऱ्यांनी राज्याला व देशाला दाखवून दिले आहे. यापुढे होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी अशीच आपली एकी कायम ठेवावी व आत्महत्या न करता, संपाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यातही भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या समर्थनात लढा दिल्याबद्दल यश आले आहे. त्यामुळे १२ जूनचे धरणे आंदोलन व १३ ला होणारे रेल्वे व रस्ता रोको आंदोलन २६ जुलैपर्यंत स्थगीत करण्यात आले आहे, असे नरेश पुगलिया यांनी कळविले आहे. बैठकीत घोषणा होताच गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण करून, गांधी चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
किसान क्रांती समितीचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित
By admin | Published: June 12, 2017 12:45 AM