जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दारूबंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी
चंद्रपूर : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविल्याच्या निर्णयाविरूद्ध येथील जिल्हा दारूमुक्ती कृती समिती आणि श्री गुरूदेव भक्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे. जीवनभर त्यांनी मद्यप्राशनचा विरोध करीत व्यसनमुक्तीसाठी जीवन अर्पण केले. महिलांच्या आंदोलनामुळे तत्कालीन भाजप सरकारने २०१५ मध्ये दारूबंदी लागू केली. परंतु महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याचा महसूल बुडण्याचे कारण पुढे करून सरकारने दारूविक्रेत्यांना पाठीशी घातल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दारूबंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. आंदोलनात चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीचे जिल्हा प्रमुख विजय चिताडे, अन्याजी ढवस, देवराव बोबडे, धर्माजी खंगार, माया मांदाडे, प्राचार्य प्रज्ञा गंधेवार, वसंत धंदरे, अवघडे गुरुजी, अरविंद मडावी, पुरूषोत्तम सहारे, अरविंद मडावी, रमेशराव ददगाल, मंजुश्री कासनगोट्टूवार, आशा देऊळकर, गीता गेडाम, नीता रामटेके, विभा मेश्राम, कल्पना गिरडकर, धनराज कोवे, उषा मेश्राम, कल्पना गिरडकर आदी सहभागी झाले होते.