चंद्रपूर : इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे इच्छा असूनही पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अनेकजण पाठवू शकत नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदानित करून या शाळांत पाल्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी मागणी पालकांनी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडे निवेदनातून केली.सर्व सामान्य वर्गातील मुलांना शुल्कात सुविधा व्हावी यासाठी शाळेला अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी आमदार नागो गाणार यांच्याकडे यावेळी केली. येथील हिंदू ज्ञान मंदिर शाळेत आयोजित स्रेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी आ. गाणार ब्रह्मपुरी येथे आले होते. यावेळी पालकांनी आमदार गाणार यांच्याशी चर्चा केली. आजच्या प्रगत भारतात मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने इंग्रजी शिक्षण अपरिहार्य झाले आहे. आपला मुलगा उच्च शिक्षणात इंग्रजी विषयामुळे कमी पडू नये व स्पर्धेत यशस्वी व्हावा, यासाठी आम्ही त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देऊ इच्छितो. परंतु, सर्वांचीच आर्थिक परिस्थिती सारखी नसल्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवू शकत नाही. कारण अशा शाळांना शिक्षण शुल्क द्यावे लागते. जे सर्वांनाच परवडण्यासारखे नसते. मात्र, या शाळांत नि:शुल्क प्रवेश द्या, असा आग्रही करू शकत नाही. शिक्षकांना वेतन देण्यासाठी शिक्षण शुल्क घेणे त्यानाही भाग असते. त्याकरीता इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदानित करुन मराठी शाळांप्रमाणे सवलती देण्यात यावे, जेणेकरून पाल्यांना त्याचा लाभ घेता येईल, अशी मागणी पालकांनी आमदार गाणार यांच्याकडे केली. यावेळी शिक्षकांनीही विविध विषयांवर चर्चा केली. (स्थानिक प्रतिनिधी)इंग्रजी शाळांत शुल्क माफीची मागणी पहिल्यांदाचइंग्रजी माध्यमांच्या शाळेतील पालकांनी आपल्या पाल्यांना शुल्क माफीकरिता शिक्षक आमदारांच्या माध्यमातून राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्याची घटना पहिलीच आहे. राज्यातील इतर इंग्रजी माध्यम शाळेतील पालक व शिक्षकांनीही इतर अनुदानित शाळेप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही सोयी, सुविधा प्रदान करण्याची मागणी शासनाकडे लावून धरावी. तसेच या शाळांच्या माध्यमातून शिकून मोठ्या पदावर गेलेल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुजनांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून शासनाला भेदभावपूर्ण शिक्षक नितीचा अवलंब न करता, येथील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणी शासनाकडे रेटून धरावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंटचे विभाग प्रमुख विवेक आंबेकर यांनी केली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही नि:शुल्क शिक्षण द्या
By admin | Published: January 22, 2015 12:46 AM