लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी संबंधितांकडे तक्रार नोंदवली. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे विमा कंपन्यांकडून अद्याप हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या पीक विम्याचा लाभ तत्काळ द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सावली तालुक्यातून २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विमा कंपनीकडून पाहणीअंती ७ हजार ५०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यात ४० हजार २६४ विमाधारक शेतकऱ्यांपैकी ५ हजार ६४५ नुकसानग्रस्तांनी तक्रार नोंद केली. सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या २० हजार २६३ एवढी आहे. यापैकी हजारो शेतकऱ्यांना पीक विमा लाभ मिळालेला नाही. सणासुदीचे दिवस आहे. बँकेचे व हात उसने कर्ज व सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी प्रचंड संकटात आहे. अन्नदात्याला दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. बियाणे, खते व इतर साहित्याचे वाढलेले प्रचंड भाव यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
केवळ खोट्या आश्वासनांची खैरातसत्ता प्राप्तीसाठी सरकारने केवळ खोट्या आश्वासनांची खैरात वाटली. योजनांचा डंका वाजवला. सरकार तुपाशी व शेतकरी उपाशी अशी स्थिती आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा सरसकट लाभ मिळाला नाही. या संपूर्ण प्रकाराला राज्यातील महायुती सरकार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हलगर्जी धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.