रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यावर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्या ५ वाहन चालकांवर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पडोली, चंद्रपूर, दुर्गापूर, रामनगर पोलीस स्टेशनचा समावेश आहे.
रस्त्याची दुरुस्ती करावी
चिमूर : येथील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी, या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अडचण जात आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे. चिमूर शहरातील संपूर्ण अंतर्गत रस्ते उखळलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
बेरोजगार युवकांना कर्ज देण्याची मागणी
सिंदेवाही : तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योगांचा अभाव आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहे. बँकांकडून कर्ज मिळत नाही. परिणामी, युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
पीकविमा रकमेपासून शेतकरी वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. या वर्षी खरीप हंगामातील धानाचे पीक वाया गेले. उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारत आहेत. प्रशासनाने विम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सिग्नल बंदमुळे वाहतूक विस्कळीत
चंद्रपूर : शहरातील वाहतूक दिवे काही वेळा बंद राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी आहे. विशेष म्हणजे, सिग्नल खांबाची उंची कमी असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारकांना दिवे सुरू आहे की बंद, हेही दिसत नाही.
तलावांतील जलसाठ्यात घट
चंद्रपूर : जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत, परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी तलावातील जलसाठा कमी होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तलाव भरतात. मात्र, नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
शहरात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : शहरातील काही वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: पठाणपुरा, तसेच बिनबागेटबाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मनपाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी केली जात आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर, तसेच बल्लारपूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते, परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता आहे. आता शाळा व महाविद्यालय सुरू झाले. सायकलवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. परिणामी, सकाळी विद्यार्थ्यांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक बांधावे, अशी मागणी केली जात आहे.
सराई मार्केटची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरातील सराई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.