भीषण टंचाई : अंधारी नदीतून देवाड्याला पाणीलोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील पाच हजार लोकसंख्येच्या देवाडा खुर्द भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. हे गाव टंचाईमुक्त करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांना महिलांनी साकडे घातले. त्यांना निवदनाद्वारे गावात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून बांधलेला जलकुंभ पाण्यासाठी व्याकुळ आहे.देवाडा खुर्द येथील पाणीटंचाई दूर करण्याकरिता पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु अजूनपर्यंत कुठलीच पर्यायी योजना करण्यात आली नाही. देवाडा खुर्दला अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी दिले जाते. या गावाला नदीच्या पात्रात पाणी असेपर्यंतच पाणी मिळते. नदी कोरडी झाली की, पाण्याचा स्रोत बंद होतो. सध्या मे महिना लागण्याआधी अंधारी नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशीच विदारक स्थिती असूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्थायी उपाययोजना केली जात नाही. स्थानिक परिसरातील लोकप्रतिनिधीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देतात आणि निवडून आल्यावर कोठे असतात, हे मतदारांना समजत नाही. ते शोधूनही सापडत नाही. या गावतील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलण्यास कोणीही तयार दिसत नाहीत. पं.स. सदस्या म्हणून निवडून आलेल्या भाजपाच्या ज्योती बुरांडे या स्वत: या गावात वास्तव्यास आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रश्न लावून धरणे आवश्यक आहे. या गावात पर्यायी व्यवस्था म्हणून लोकसहभागातून भारत ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु त्या योजनेलाही ग्रहण लागले आहे. या योजनेत ५६ लाख रुपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आला. परंतु त्या जलकुंभात पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे स्थानिक महिला व नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक बैलगाडीने तलावातील व शेतशिवारातील पाणी आणून आपली उपजिविका भागवित आहेत. त्यामुळे त्यांचे इतर शेतीविषयक कामकाजावर दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी रोजगाराकडे दुर्लक्ष करावे लागत आहे.तीन मंत्र्यांना निवेदन सादरपोंभूर्णा येथे बचत गटामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महिलांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना देवाडा खुर्द येथील महिलांनी निवेदन सादर केले. त्या निवेदनाच्या प्रती ना. मुनगंटीवार व ना. मुंडे यांनाही देण्यात आल्या.
टंचाईमुक्तीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2017 12:37 AM