महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्या, यासाठी विविध योजनांचा आराखडा तयार करण्यात आला. शहरातील वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करण्यासाठी शेकडो नागरिकांनी अर्ज केले. या बांधकामामुळे मनपाला बऱ्यापैकी शुल्क मिळाले. गुंठेवारी जमिनीची प्रकरणे प्रलंबित असल्याने तेही निकाली काढण्यासाठी एजन्सीची नियुक्ती झाली. २०१९-२० वर्षामध्ये या कामातून उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा मनपाला होती. परंतु, गुंठेवारी प्रकरणे फाईलबंद झाले. गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार १ जानेवारी २००१ पूर्वीच्या मालमत्तांना या कायद्यांतर्गत नियमाकूल करण्याची परवानगी मनपाला मिळाली आहे. यातून १२ कोटी ५० लाखांचे उत्पन्न होण्याची अपेक्षा मनपाला आहे. परंतु, शहरातील विविध वार्डातील नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी मनपाने ठोस धोरण तयार केले नाही.
३.५५ कोटींचा स्वेच्छानिधी
वार्डातील विविध समस्या सोडविण्यासाठी याकरिता झोननिहाय नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे ३. ५५ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मात्र, हा निधी विहित कालावधीत मिळणार काय, असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
उद्यान विकासकामे थंडावली
चंद्रपूर शहर विकास योजनेसाठी मनपाने पाऊल उचलले आहे. पण, विकास योजना आराखडा व भूसंपादन या संदर्भात प्रशासनाची गतिमानता दिसून येत नाही. शासनाकडून विविध योजनांसाठी अनुदान मिळते. कोरोनामुळे यंदा उत्पन्नाला फटका बसला. आरोग्यावर अधिक खर्च करावा लागत आहे. परिणामी, शहरातील विविध वॉर्डांतील उद्याने व आझाद गार्डनच्या कामालाही गती नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.