राजुरा : राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुलासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच येथे सुसज्ज क्रीडा संकूल साकारणार आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण, आदिवासीबहुल, अतिदुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी येथे अत्याधुनिक सुविधायुक्त आणि सुसज्ज क्रीडांगणाची नितांत गरज होती. क्षेत्रातील क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांची अनेक वर्षापासून ही मागणी होती. आमदार सुभाष धोटे यांच्याकडे अनेकांनी ही मागणी लावून धरली होती. या अनुषंगाने आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे क्षेत्रातील राजुरा, कोरपना आणि गड्चांदूर येथील तालुका क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येकी आठ कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी येथे तालुका क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या प्रत्येक ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये २०० मी. ट्रॅक, खो - खो, कबड्डी, व्हॉलिबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट, पार्किंग परिसर, पाण्याची सुविधा, प्रेक्षक गॅलरी, संरक्षण भिंत, चौकीदार केबिन, प्रवेशद्वार, चेंजिग रूम, प्रसाधन गृह, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण इत्यादी सुविधांचा ढोबळ मानाने समावेश करण्यात आलेला आहे.