लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी ‘नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदच्या वतीने चंद्रपुरातील चित्रपटगृहात ‘पॅडमॅन’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पवार व शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, शाळेतील किशोरवयीन मुलींच्या गळतीचे प्रमाण व मासिक पाळीविषयी ग्रामीण भागात व विषयाची जाणीव जागृती व्हावी व महिलांचे आरोग्य सुदूढ निरोगी राहावे, या सामाजिक हेतुने हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. मासिक पाळीच्या चार-पाच दिवसांमध्ये स्त्रीयांनी शरिराची योग्य ती स्वच्छता राखली पाहिजे, अन्यथा जंतू संसर्गजन्य रोग होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक मुली शाळेत जाणे टाळतात. कारण कित्येक शाळांमध्ये स्वच्छतागृह पाहिजे तशी अजून उपलब्ध नाहीत. सॅनिटरी पॅड बदलण्याची सोय नाही किंवा साधनांची उपलब्धता नाही. आता शाळांमधूनही सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडींग मशिन्स बसवण्याचा प्रयत्न होत आहे.शाळांच्या माध्यमातून गावागावात या विषयाची जाणीव जागृती व्हावी व महिलांनी आपले आरोग्य सुदृढ तसेच चांगले राखावे, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर यांनी केले. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतुर येथील अरुणाचलम मुरुगानथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीनची निर्मिती केली. स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून प्रसार प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आणि त्यावेळात महिलांना देण्यात येणारी वागणूक याविषयी समाजात बरेच गैरसमज आहेत. तेच मोडित काढणे हा चित्रपट दाखविण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले. चित्रपटामध्ये मासिक पाळी आणी सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता अस्मिता योजनेचा शुभारंभ राज्यस्तरावर नुकताच झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूरचे वतीने किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीनचा वापर व्हावा व वैयक्तिक स्वच्छता ठेवली जावी. याकरिता जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे.
‘पॅडमॅन’द्वारे सॅनिटरी नॅपकीन स्वच्छतेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:38 PM
जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी ‘नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदच्या वतीने चंद्रपुरातील चित्रपटगृहात ‘पॅडमॅन’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला.
ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : चंद्रपुरात किशोरवयीन मुलींना चित्रपट दाखवून प्रबोधन, शिक्षकांची उपस्थिती