चंद्रपूर : वनडेपोमध्ये व्यापाऱ्यांना विकण्यासाठी लाकडे व बांबू ठेवले जाते व नंतर ती लिलावात विकली जातात. तसेच स्थानिक नागरिकांना बिटाच्या रुपात जळाऊ लाकडे विकण्यात येतात. परंतु मागील काही महिन्यापासून नागरिकांना जळावू लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे इंधनाची नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.पूर्वी जंगलातून काड्या, फाटे आणण्यासाठी ग्रामपंचायतकडून लोकांना पॉसेस दिल्या जात होता. मागील काही वर्षांपासून सदर प्रकार बंद करण्यात आला. त्यामुळे नागरिकांकडे जाळण्यासाठी लाकडे नाहीत. पूर्वी वन विभागाकडून बिट्ट्या दिल्या जायच्या परंतु आता मात्र तेही बंद आहे. त्यामुळे जंगल परिसरातील नागरिकांनी इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था झाली आहे.जिल्ह्यात वन विभागाचे अनेक डेपो आहेत. येथे व्यापाऱ्यांना लिलावात विकण्यासाठी लाकूड व बांबू उपलब्ध करून दिल्या जातोे. परंतु स्थानिक नागरिकांना इंधन म्हणून वापरण्यासाठी लाकूड उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वन विभागाने स्थानिक नागरिकांसाठी बिट्ट्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जळाऊ लाकडे उपलब्ध करून दिलीत तर जंगलातील चोरीचे प्रमाण निश्चितच कमी होईल. परंतु याचा विचार होताना दिसत नाही. नागरिकांनी जंगलामध्ये जावून लाकडे आणली तर त्यांनाच दोष देण्यात येतो. डेपोमध्ये जळावू लाकडे मिळत नाहीत. त्यामुळे आपण बैलबंड्या घेऊन जंगलात जाऊ व वाळलेली लाकडे घेऊन येऊ व वन विभाग कोणती कारवाई करते ते पाहून टाकू, असाही एक सूर नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे भविष्यात वन विभाग विरुद्ध नागरिक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जंगलातील वाळलेली लाकडे आणण्याची नागरिकांना अधिकृत परवानगी द्यावी, तसेच जंगल परिसरातील सर्वच नागरिकांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)
जळाऊ लाकडांकरिता नागरिकांची भटकंती
By admin | Published: July 19, 2014 11:51 PM