बल्लारपूर : महिलांनी गावात विक्री होत असलेली दारू पकडून दिलीच. तेवढ्यावरच न थांबता सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये जावून दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस निरीक्षकांसमोर केली. हे धाडस येथून जवळ असलेल्या कळमना येथील महिलांचे आहे.कळमना येथे गेले अनेक दिवसांपासून दारु विक्री सुरू आहे आणि याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या मार्गदर्शनात येथील जागरुक महिलांनी दारू मुक्ती महिला समिती स्थापन केली आहे. या समितीची गावातील दारू विक्रीवर पाळत आहे. गावातील दारू विक्रेत्यांना या समितीने, दारू विकू नका, अशी विनंती केली. मात्र, त्यांच्या विनंतीला न जुमानता त्यांनी दारू विक्री सुरूच ठेवली. अखेर मंगळवारच्या सायंकाळला समितीचे पदाधिकारी आणि गावातील इतर अशा सुमारे ४०-५० महिलांनी दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी धडक देऊन दारू पकडली आणि तशी वर्दी बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली. बल्लारपूर पोलिसांनी कळमना येथे पोहचून १० हजार ३१० रुपये किमतीची देशी दारू जप्त करुन सत्यपाल मोगरे रा. कळमना याला पकडले. तर रामचंद्र भिमा आत्राम आणि सरु घुगलोत हे पळून गेले. दारू विरुद्ध एल्गार करणाऱ्या येथील सुमारे ३० महिलांनी लगेच बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक नरुमणी टांडी यांच्याकडे, दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची तसेच फरार झालेल्या दारू विक्रेत्यांना अटक करण्याची मागणी केली. यावर टांडी यांनी तसे आश्वासन महिलांना दिले. (तालुका प्रतिनिधी)
दारू पकडून महिला पोलीस स्टेशनवर धडकल्या
By admin | Published: October 01, 2015 1:21 AM