चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वृक्षारोपणाच्या संवर्धनासाठी लावण्यात आलेले फायबर कठडे निविदा न काढताच खरेदी करण्यात आल्याचा प्रकार कोरपना पंचायत समितीमध्ये घडला. दरम्यान बिल काढण्यासाठी आता लेखापालाकडे तगादा लावण्यात येत असून त्याला कामावरून काढण्याची धमकीही दिली जात आहे. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध उपक्रम राबविले जातात. कोरपना पंचायत समितीने पावसाळ्यात रोहयोंतर्गत गावात वृक्षारोपण केले. लावलेली झाडे जगावी यासाठी फायबर कठडे लावण्याचा विचार समोर आला. एक हजार ते ५० हजार रुपयांची साहित्य खरेदी करायची असेल तर, निविदा काढाव्या लागतात. त्यापेक्षा जास्त किमतीचे असेल तर ई-टेंडरिंग करावे लागते. मात्र कोरपना पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांनी असे न करता चक्क तीन लाख ३० हजार रुपयांचे फायबल कठडे खरेदी केले. एका कंत्राटदाराकडून याची खरेदी करून त्यानंतर कठडे झाडांच्या संरक्षणासाठी लावण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांनी फायबर कठड््याचे बिल काढण्याचा प्रयत्न सुरु केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यजनेच्या लेखापालाकडे हे बिल सादर करण्यात आले. बिल सादर करताना कोटेशन पुरवठा आदेश, बिल, ग्रामपंचीयताचा ठराव, कठडे घेण्यासंदर्भात कृषी अधिकाऱ्याचे पत्र लागते. मात्र कुठलेच कागदपत्र त्यांच्याकडून सादर करण्यात आले नाही. त्यामुळे ई टेंडरिंग न करता फायबर कठडे खरेदी करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. कागदपत्रे सादर न करता पंचायत समितीचे अधिकारी बिल मागत असल्याने लेखापालने त्याला नकार दिला. त्यामुळे लेखापालाला आता मानसिक त्रास दिला जात आहे.विस्तार अधिकाऱ्यांकडून त्रास वाढत असल्याने लेखापालाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्याच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, तहसीलदारांना पाठविल्या आहे. या तक्रारीवर आता कोणती कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(नगर प्रतिनिधी)
ई-निविदा न काढताच साहित्याची खरेदी
By admin | Published: August 26, 2014 11:21 PM