वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विविध रंगांची फुले ही तेलगू भाषिकांची अत्यंत प्रिय वस्तू. फुलांना तेलगू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्याच्या व्यवहारात विविध कारणांनी फुलांशी संबंध येतोच. त्यांची धार्मिक विधी व उत्सव सण फुलांशिवाय साजरा होत नाही. त्यांना फुलांविषयी कमालीचे आकर्षण आहे. याच आकर्षणातून तेलगू भाषिकांचे श्रद्धास्थान असलेल्या बतकम्मा अर्थात देवी गौरीची विविध फुलांद्वारे सुंदर देखणी प्रतिमा तयार करून मनोभवे पूजा केली जाते. हा पर्व नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवच असतो. गौरीची पिवळ्या रंगाची छोटी मूर्ती आणि त्याभोवती दररोज विविध फुलांच्या चढत्या कमानीचे रिंगण, अशी ही बतकम्मा तयार करून नवव्या दिवशी विसर्जन केल्या जाते.बतकम्मा पर्वामागे दोन वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. त्याचा एकंदर सार ‘जगा आणि जगू द्या’ असा आहे. बतकम्मा या तेलगू शब्दाचा अर्थ जिवंत राहा अथवा अमर व्हा असा होतो. पिवळा रंग पवित्र व उत्साहाचे प्रतीक मानला जातो. यामुळे बतकम्मा हा मनोरा तयार करताना विविध रंगांच्या फुलांसोबत पिवळ्या रंगांची सर्व जातीची फुले हमखास वापरली जातात. बतकम्मा घरी तसेच सार्वजनिकरित्या तयार केली जाते. फुलांची योग्य मांडणी व आकर्षक रंगसंगतीमुळे कलात्मकता येते. बतकम्मा बनविणाऱ्यांच्या कल्पकतेचा प्रसंगी कसही लागतो. बतकम्माचे फुलोरी मनोरे एक ते दीड दोन फुटांपर्यंत तर सार्वजनिक ठिकाणाचे त्याहून उंच असतात. नऊ दिवस बतकम्मा मोठ्या श्रद्धेने तयार करून विसर्जनाचे दिवशी बतकम्माभोवती दिव्यांची आरास तयार केली जाते. परंपरागत भक्तीगीत गात महिला तिच्याभोवती नृत्याचा फेरा धरतात. मिरवणुकीने वाजत गाजत नदीवर नेऊन तिचे श्रद्धापूर्वक विसर्जन करतात. आंध्र प्रदेश व तेलंगणात हा पर्व मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात मंगळागौर तशी आंध्र ्रप्रदेशातील बतकम्मा स्वरूप थोडे वेगळे एवढेच! हा पर्व आंध्रातला असला तरी बल्लारपूर व चंद्रपूर भागात तेलगू भाषिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उत्साहाने साजरा होतो. बल्लारपूरला वर्धा नदीच्या गणपती घाटावर नवमीला रात्री बतकम्मा विसर्जनप्रसंगी यात्रा भरते. तेलगू भाषिक महिलांचा उत्सव बघण्यासारखा असतो.
पुष्पक बतकम्माने तेलगु संस्कृतीला समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:12 PM
विविध रंगांची फुले ही तेलगू भाषिकांची अत्यंत प्रिय वस्तू. फुलांना तेलगू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्याच्या व्यवहारात विविध कारणांनी फुलांशी संबंध येतोच.
ठळक मुद्देनऊ दिवस कार्यक्रमांची रेलचेल : चंद्रपूर, बल्लारपुरात उत्साहाला उधाण