राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुधात होणारी भेसळ आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम ‘क्यूआर कोड’ द्वारे रोखण्यात येणार आहे. दुधामधील भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्रे या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्या क्यूआर कोडच्या माध्यमातून भेसळ करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे.दुधातील गुणवत्ता, दर्जा राखण्याकरिता शेतकरी दूध काढण्यासाठी हातमोजे वापरतो किंवा नाही, दूध काढण्याचे भांडे, दूध संकलन केंद्राच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ आहे किंवा नाही, याची खात्री करण्यात येणार आहे. दूध संकलन केंद्र आणि दुधाची प्रक्रिया करण्यात येणाºया ठिकाणी पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.दुधातील भेसळ रोखल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम दिसणार आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून भेसळमुक्त दूध ग्राहकांना देण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने डी. एन. व्ही. जी. एल. आणि आय.आर. क्यू. एस. या कंपनीबरोबर या संदर्भात करार केला असून दुधातील भेसळ आणि दुधाचा दर्जा राखण्यासाठी या कंपन्यांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.तसेच दुुधाची जागेवर तपासणी करुन दुधाच्या दर्जाबाबत खात्री करण्यासाठी मोबाईल प्रयोगशाळा वापरण्यात येणार आहे. याद्वारे दूध भेसळ करणाºयांवर जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे. दूग्ध व्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्तपणे ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल व्हॅन अद्ययावत असून याद्वारे दुधाच्या नमुन्यांची तपासणी, जनजागृती, महत्त्वाचे संदेश, प्रात्यक्षिके अशा विविध दहा प्रकारच्या सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत.दुग्ध विकास विभागातील कार्यरत रसायनशास्त्रज्ञ (केमिस्ट) यांच्यामार्फत तपासणी करणे शक्य असल्याने तशी तपासणी करण्याबाबत रसायनशास्त्रज्ञांना आवश्यक प्रशिक्षणही अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ तपासण्याकरिता अन्न व औषध प्रशासन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांचे जिल्हानिहाय संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. पथकाच्या समन्वयाकरिता जिल्हास्तरावरील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त व जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी काम पाहणार आहे. तपासणी पथकामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी, दुग्धशाळा पर्यवेक्षकासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
क्यूआर कोड रोखणार दुधातील भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 2:17 PM
दुधामधील भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्रे या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देराज्यभरातील दूध संकलन केंद्रांना देणार कोड