गडचांदूर : पंचायत समिती कोरपना अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगावला अव्वल गुणवत्ताप्राप्त व उपक्रमातील शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. मात्र या शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर बोंडे व कार्यरत सात शिक्षकांना दिवाळी अंधारात काढावी लागली आहे. सप्टेंबर २०१४ चे वेतन न मिळाल्याने या शाळेच्या सर्वच शिक्षकांच्या घरातील प्रकाशपर्व अंधकारमय झाले. या संपुर्ण घटनेला जबाबदार असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे शालार्थ वेतन देयक करताना शाळेतील शिक्षण सेवक ए.एस. राठोड यांचे नाव वेतन देयकात येत नव्हते. याबाबत मुख्याध्यापक बोंडे यांनी पंचायत समिती कार्यालयात काम करणारे शालार्थ प्रणालीचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक चौधरी व ढगे यांना याबाबत मार्गदर्शन मागितले असता तुम्ही आमच्याकडून देयक तयार करून घेत नसल्यामुळे आम्हाला विचारू नका, असे उत्तर दिले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांची मुख्याध्यापकांनी भेट घेतली. त्यांना समस्या सांगितली असता त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केले नाही. शेवटी मुख्याध्यापकांनी राठोड यांचे नाव वगळून वेतन देयक ३ आॅक्टोबरला सादर केले. ४ आॅक्टोबरला पंचायत समितीला एक प्रत सादर केली. १७ आॅक्टोबरला सप्टेंबर २०१४ चे सर्व शाळांचे वेतन काढले. मात्र पिंपळगाव शाळेचे वेतन काढण्यात आले नाही. त्यामुळे या शाळेतील सर्व शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली. एका उपक्रमावरील शाळा सुधारणेचा ध्यास घेतलेल्या व शाळेसाठी तन-मन-धनाने काम करणारे मुख्याध्यापक बोंडे यांनी चांगलाच धसका घेतला. त्यांना हृदयविकाराचा आघात झाला. उपचारासाठी पैसे नव्हते. अखेर कर्ज घेऊन नागपूर येथे दवाखान्यात उपचार करावव लागले. या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पुरेसे ज्ञान नसणाऱ्या, योग्य मार्गदर्शन न करणाऱ्या शिक्षकांना कार्यालयीन कामातून मुक्त करावे. निष्क्रीय गटशिक्षणाधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय भोगेकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
गुणवत्ताप्राप्त शाळेतील शिक्षकांचे वेतन अडले
By admin | Published: October 25, 2014 1:10 AM