लोकमत न्यूज नेटवर्क घुग्घुस : येथील अमराही वार्डमधील भूस्खलनच्या घटनेला सोमवार (दि. २६) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. धोकादायक परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या १६९ नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. वेकोलीने त्या बाधित कुटुंबीयांना दीड वर्ष ३ हजार रुपये किराया दिला. त्यानंतर बंद केल्याने आता ते कुटुंब परत त्या परिसरात वास्तव्यासाठी गेले आहे. मात्र, पुन्हा अशी घटना झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न कायम आहे.
दोन वर्षांपूर्वी २६ ऑगस्ट २०२२ ला सायंकाळी अमराही वार्डात भूस्खलन झाले. गजानन मडावी यांचे घर ६०-७० फूट भूगर्भात गेले. परिसरात हाहाकार माजला. त्या परिसरातील कुटुंबीयांना तत्काळ अन्यत्र हलविण्यात आले. सहा महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन शासन, प्रशासनाने दिले. पुनर्वसन होईपर्यंत महिन्याकाठी तीन हजार रुपये देण्याचे लोकप्रतिनिधी, तत्कालीन जिल्हाधिकारी व अन्य जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठरले.
दीड वर्षापर्यंत वेकोलीने तीन हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर बंद केल्याने बाधित कुटुंबीय पुन्हा भूस्खलन झालेल्या जागेत राहण्यासाठी गेले. १६९ नागरिकांच्या पुनर्वसनासाठी वेकोलीच्या शिवनगरला लागून असलेल्या महसूल विभागाच्या सर्व्हे नं. २१/१ मधील ६ एकरांच्या भूखंडाची पाहणी व सीमांकन झाले.
पुन्हा धोका होण्याची शक्यता चंद्रपूर येथे मागील काही दिवसांपूर्वीच अशीच घटना घडली होती. दरम्यान, घुग्घुस येथील घटनेला दोन वर्षे लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.