शहरातील आनंदवन चौकातील एका हाॅटेलात महिनाभरापासून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर एका युवकाने जिंकलेली रक्कम हिसकावून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्तेसह त्याच्या चार साथीदारांनी बेदम मारहाण केली. ९ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकरणी वरोरा पोलिसांनी चक्क दुसऱ्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्तेसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध कलम ३२४, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हे दाखल केला. नितीन मत्तेसह त्याच्या चेतन भोंगाडे, प्रतीक ताजने, मोगरा लोहकरे, सुनील बावणे या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याचे वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, आनंदवन चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मालकीचे हाॅटेल आहे. या हाॅटेलात मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या जुगार सुरू होता. येथे जुगार खेळायला प्रवीण सुधाकर पारखी (३०) हा येत होता. तो मागील काही दिवसांत सुमारे सात-आठ लाख रुपये हरल्याचे समजते. ९ सप्टेंबरला तो पुन्हा जुगार खेळायला आला असता, त्याने तब्बल १२ लाख रुपये जिंकले. हे पाहून नितीन मत्ते व त्याच्या सहकाऱ्यांना खटकले. त्यांनी तू एकटाच कसा जिंकतो. तुझ्या मोबाईलमध्ये सेन्सर लावला असल्याचे म्हणत त्याच्याजवळील रक्कम हिसकावून घेत त्याला जबर मारहाण केली. यामध्ये प्रवीण पारखी हा गंभीर जखमी झाला. जखमीवर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. जखमी युवकाच्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्तेसह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. नंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली.
या जुगाराला आशीर्वाद कुणाचा?
वरोरा येथील आनंदवन चौकात हा जुगार सुरू होता. या अड्ड्यावर एका युवकाला बेदम मारहाण होते. मात्र, याची माहिती वरोरा पोलिसांना होत नाही. जखमी हा चंद्रपुरात उपचार घेताना ही घटना बाहेर आल्यानंतर वरोरा पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या. अन्यथा, ही घटना दबली असती, असा सूर वरोऱ्यात आहे. वरोरा शहरात चोरी, जुगारासारखे अवैध व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून अपेक्षित कारवाया होत नसल्याची शहरातील नागरिकांची ओरड आहे.