कायदा शिथिल होणार : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपूर : पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत रेडिओलॉजी, सोनोग्राफी तज्ज्ञांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायद्यात आवश्यक दुरुस्तीसाठी रेडिओलॉजी असोसिएशनने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे महाराष्ट्र शासन व असोसिएशनने कमिटी स्थापन करण्याचे ठरविले होते. ती कमिटी गठित झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी चंद्रपूरचे डॉ. रवी अलूृरवार, डॉ.अनिल माडूरवार, मुंबईचे डॉ.जिग्नेश ठक्कर, डॉ.समीर गांधी, डॉ.शैलेंद्र सिंग, डॉ.संजीव मनी, डॉ. हेमंत मनीयार, पुण्याचे डॉ. गुरुराज लच्चन, डॉ.विनय चौधरी, डॉ. विरेन कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओलॉजी /सोनोग्राफी तज्ञांचे समस्यांचे गांभीर्य ओळखून कायद्यात शिथिलता आणण्याकरिता समिती गठित करावी, असे सांगितले होते. त्यानुसार आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी समिती गठित केली. असोसिएशनतर्फे लिंगभेद चाचण्यास विरोधच आहे. परंतु एफ-फार्म भरण्यात होणाऱ्या किरकोळ चुका व इतर कारकुनी चुकांकरिता फौजदारी गुन्हे दाखल करू नये व सोनोग्राफी मशिन सील करण्यात येऊ नये, अशी असोसिएशनची मागणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा योग्यरित्या, समानतेचे तसेच कुठल्याही पूर्वग्रह दूषित मनाने वापर होणार नाही, याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, अशीही मागणी आहे. (प्रतिनिधी)
रेडिओलाजी, सोनोग्राफी तज्ज्ञ समिती गठित
By admin | Published: July 30, 2016 1:25 AM