चंद्रपूर : घरात दारूची साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीच्या विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी एक लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. दारूतस्कर फरार असून, त्याच्याविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव चौधरी असे दारूतस्कराचे नाव आहे.
येथील नागपूर मार्गावरील वृंदावननगरात उद्धव चौधरी राहतात. मागील काही दिवसांपासून चौधरी यांनी दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. या प्रकाराची कुणकुण परिसरातील नागरिकांच्या कानावर आली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दारूतस्कर आणि विक्रेत्यांविरोधात जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू केली आहे. अशात एका खबऱ्यामार्फत वृंदावननगरातील दारूविक्रीची माहिती पोलीस निरीक्षक खाडे यांना मिळाली. त्यानंतर नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांच्या पथकाने वृंदावननगरातील उद्धव चौधरी यांच्या घरी छापा टाकला. घराची संपूर्ण तपासणी करण्यात आली. यावेळी शौचालयात साठवून ठेवलेला सुमारे एक लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.