चंद्रपूर: तालुक्यातील जुनासुर्ला येथे तीन वर्षांपासून रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) हा इसम आंध्र प्रदेशातून आलेला इसम परिसरातील शेतकऱ्यांना भुलथापा देऊन जमिनी भाडेतत्त्वावर घेणे, शेतात चोरबिटीचा वापर करीत असल्याची माहिती गुणनियंत्रक पथकाला मिळाली. त्या आधारावर चांदापूर हेटी येथील पथकाने धाड टाकून ९ लाख ४८ हजार रुपये किमतीचे तब्बल पाच क्विंटल कापसाचे चोरबिटी बियाणे जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने चोरबिटी बियाणांचा वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मूल तालुक्यातील बोरचांदली, चांदापूर, बेंबाळ, जुनासुर्ला आदी गावात भाडे तत्त्वावर शेती घेऊन चोरबिटीची लागवड करून जमिनी नापिकी होत असल्याची ओरड सुरू होती. त्यामुळे नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक शेंडे, चंद्रपूरचे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, जिल्हा परिषद चंद्रपूरचे जिल्हा कृषी अधिकारी विरेंद्र राजपूत, विभागीय गुण नियंत्रक अधिकारी लंकेश कटरे यांनी मूल तालुक्यात करडी नजर ठेवली होती. दरम्यान २० फेब्रुवारीला गुणनियंत्रक पथकाने चांदापूर हेटी येथील रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) यांच्या शेतात धाड टाकून तपासणी केली केली.
त्यावेळी मिरची व कापूस लागवड केलेल्या शेतात असलेल्या स्लॅबच्या घराच्या बाजूला उभ्या केलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये दहा पोते खुले अनधिकृत पाच क्विंटल एचटीबीटी कापूस बियाणे आढळून आले. कृषी विभागाच्या पथकाने ९ लाख ४८ हजार रुपयांचे बियाणे, ट्रॅक्टर असा १३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिस स्टेशन मूलमध्ये जमा केला. तसेच रवीकुमार गाेटेपट्टी विरुद्ध तक्रार केली. ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी लंकेश कटरे, जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी श्रावण बोडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, पंचायत समिती मूलचे कृषी अधिकारी किशोर चौधरी, सुनील कारडवार आदींनी केली.