माजरी (चंद्रपूर) :रेल्वेच्या जागेवर कित्येक वर्षांपासून पक्की घरे बांधून राहत असलेल्या १६ घरांवर व दुकानांवर अखेर सोमवारी सकाळी ७ वाजता रेल्वेचा बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आली. सुमारे ४०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी एकाएकी आपले राहते छत उघडे पडल्याने अतिक्रमणधारकांचा आक्रोश सुरू होता.
भद्रावती तालुक्यातील माजरी येथे रेल्वेच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधून रहिवास सुरू केला. अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण हटविणार नाही, या मानसिकतेत ही मंडळी असताना अचानक रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना आपले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावरून नागरिकांनीही या सूचनेला कडाडून विरोध दर्शविला. इतकेच नव्हे, तर माजरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात आले. येथे वास्तव्यास असणारे नागरिक एकाएकी घरे गेल्यानंतर कुठे जातील, ही बाब लक्षात घेऊन लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने दिलेल्या सूचनेनुसार अखेर पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून १६ घरे व दुकाने जमीनदोस्त केली.
संघर्ष समितीचे पदाधिकारी नजरकैदेत
माजरी येथील संघर्ष समितीचे पदाधिकारी राजेश रेवते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास रत्नपारखी व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, सरपंच जंगमताई माजरीतील शेकडो स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यवाहीला तीव्र विरोध केला होता. रेल्वे प्रशासनाने या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्याला सुरुवात केली. तेव्हा रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. जनतेचा वाढता विरोध पाहून माजी जि. प. सदस्य प्रवीण सूर, राजेश रेवते व उल्हास रत्नपारखी यांना माजरी पोलिसांनी नजरकैद करून पोलीस ठाण्यात ठेवले. त्यानंतर नागरिकांचा आक्रोश व विरोध मोडून काढत जेसीबीच्या साह्याने १६ घरे व दुकाने रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात आली.
१४९ कलमाचा आधार, छावणीचे स्वरूप
या कार्यवाहीला विरोध होऊ नये, यासाठी परिसरात कलम १४९ लावण्यात आले होते. मोठा पोलिसांचा फौजफाटा असल्याने क्षणात राहती घरे व परिवार जगविण्याचे साधन असलेली दुकाने बेचिराख करण्यात आली. कार्यवाही सुरू असताना सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. तर सर्व रहदारीच्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त असल्याने माजरी गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अश्रू अनावर, आता आपण राहायचे कुठे?
आपल्या डोळ्यादेखत वर्षानुवर्षांपासून राहत असलेली घरे भुईसपाट होताना पाहून त्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. आता आपण बेघर झाल्याने आता पुढे राहायचे कुठे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? हे प्रश्न यावेळी उपस्थित होत होते.
कार्यवाही ही नियमानुसार होत आहे. ही जागा रेल्वे प्रशासनाची असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून इथे परिवार राहत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करत ही अतिक्रमित जागा खाली करण्याची मोहीम सुरू केली. सर्व कार्यवाही शांततेत पार पडली.
- विनीत घागे, ठाणेदार, माजरी.
रेल्वे प्रशासनाने बळाचा वापर करून आम्हाला बळजबरीने नजरकैद केले आणि जनतेचा विरोध मोडून काढत दुकाने आणि घर जमीनदोस्त केली. या जुलमी रेल्वे प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि माजरी येथील जनतेसाठी आमचा हा संघर्ष सुरूच राहील.
- प्रवीण सूर, माजी जि. प. सदस्य, माजरी.