सावरगाव : कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी मार्चपासून लॉगडाऊन करण्यात आले. तेव्हापासून पॅसेंजरसह सर्व रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मात्र, मध्यंतरी काही सुपरफास्ट गाड्या सुरू करण्यात आल्या आणि कोरोनाचा प्रादुर्भावही थांबला होता. मात्र, पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. परंतु, अलीकडे कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. त्यातच नागरिकांचा प्रवास बिनधास्त सुरू आहे. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
चांदा फोर्ट रेल्वेस्टेशनवरून बल्लारपूर - गोंदिया पॅसेंजर आणि इतर डेमो गाड्या दररोज धावत होत्या. हजारो प्रवासी या मार्गांवरून प्रवास करीत होते. कुणी नोकरीसाठी, कुणी जिल्ह्याच्या कामाकरिता तर कुणी खरेदी व अन्य कामांसाठी प्रवास करीत असल्याने या मार्गांवरील नागभीड, तळोधी रोड, आलेवाही, सिंदेवाहीसह छोटे -मोठे रेल्वेस्टेशन प्रवाशांनी गच्च भरून दिसायचे. यामुळे छोटे -मोठे व्यावसायिक रोजीरोटी कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रेल्वेने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याने दररोज हजारोंहून अधिक नागरिक सुखरूप घरी परत येत होते. मात्र, मागील वर्षीच्या लॉकडाऊनपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्याने नागरिकांना बसने गर्दीत प्रवास करावा लागत आहे. परिणामी, प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे, कोरोनाची पुन्हा लाट येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही सुपरफास्ट गाड्या सुरू असताना आज वर्षभरापासून पॅसेंजर रेल्वेच बंद का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
फोटो : नागभीड तालुक्यातील आलेवाही रेल्वेस्टेशन असे ओस पडले आहे.