परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रमुख रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यांतर्गत बल्लारपूर रेल्वे जंक्शन येथे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र बरेचदा ही वाय-फाय सेवा बंदच राहत असल्याचे दिसून येते. प्रवाशांनादेखील या वाय-फाय सेवेची माहिती नसल्याने ही वाय-फाय सेवा नावालाच असल्याचे बोलले जाते. रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही.
प्रवाशांना वाय-फाय ठाऊकच नाही
अनेकदा रेल्वेने प्रवास केला. मात्र रेल्वेस्थानकावर रेल्वे विभागातर्फे वाय-फाय सेवा मोफत आहे. याबाबत आपणाला पुसटशी कल्पनाही नाही. तसेच कुठे फलकही लावला नसल्याने कधीच या वाय-फाय सेवेचा उपभोग घेतला नाही.-प्रशांत खोब्रागडे
आजपर्यंत अनेक छोटमोठ्या स्टेशनवरून रेल्वेने प्रवास केला. मात्र याबाबत माहितीच नाही. तसेच रेल्वेस्थानकावर असताना कधी मोबाइलवर वाय-फायसंदर्भात तशा प्रकारचे नोटिफिकेशन आल्याची माहिती नाही. त्यामुळे कधीच रेल्वेस्थानकावर वायफाय सेवेचा वापर आपण केला नाही.-प्रतिश मोटघरे
पॅसेंजर अद्यापही बंदसद्य:स्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून २८ रेल्वे धावत आहेत. मात्र या रेल्वेला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे रिकाम्याच धावत असल्याचे दिसून येतात. त्यातच पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांची मोठी पंचायत होत आहे.
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या सर्वांसाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश प्रवासी या सेवेचा उपभोग घेतात. रेल्वे कर्मचाऱ्यांपासून अधिकारीसुद्धा या सेवेचा वापर करतात. ही वाय-फाय सेवा सुरळीत सुरू आहे. रामलाल सिंग, स्टेशन मास्तर