नियोजनाअभावी मूल शहराची दयनीय अवस्था
राजू गेडाम
मूल : शहराच्या भौतिक विकासाबरोबरच पायाभूत विकास होणे आवश्यक आहे. कुठल्याही गावचा अथवा शहराचा विकास करायचा असेल तर त्यापूर्वी त्याचा आराखडा तयार होणे महत्त्वाचे असते. मात्र मूल शहराचा विकास करताना विकास आराखड्याला बगल दिल्याने आजच्या घडीला पावसाचे येणारे पाणी नागरिकांच्या घरात शिरून लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे.
याला जबाबदार नगर परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याची ओरड नागरिकांद्वारे केली जात आहे.
मूल शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मागील पंचवार्षिकमध्ये बरेच प्रयत्न झाले. वाॅर्ड तेथे रस्ता हे ब्रीदवाक्य जोपासत वाॅर्डातील सर्वच रस्ते चकाचक करण्याचा जणू चंगच बांधला होता. त्यासाठी निधीही मिळाला. नगर परिषद मूलच्या बांधकामाचा दर्जा समाधानकारक राहत नसल्याची ओरड झाल्याने संपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय चांगला असला तरी नगर विकासाचा आराखडा तयार करणे आवश्यक होते. यासाठी नगर परिषद प्रशासन, पदाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे चर्चा करून मूल शहरातील जुनी वस्ती व नवीन वस्तीचा नियोजनबद्ध आराखडा तयार करणे गरजेचे होते. जुन्या वस्तीचे बांधकाम हे त्या वेळच्या परिस्थितीनुरूप असल्याने बदलत्या काळाबरोबर त्यात फार मोठा बदल होणे स्वाभाविकच आहे. पूर्वीच्या घराची उंची कमी असल्याने शहरातील सर्वच रस्ते व नाल्याची कामे नियोजन न करता करणे हे अनेकांचे नुकसान करणारे ठरू शकते, याची जाण ठेवणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर नालीतील पाण्याचा प्रवाह थेट घरात शिरून अन्नधान्य व इतर साहित्याचे नुकसान होत आहे. हा प्रकार एकदा नाही तर तीन ते चार वेळा घडला आहे.