रिपब्लिकन पार्टीच्या युवक अध्यक्षपदी वृषभ गुळधाने
चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्षपदी वृषभ सुधाकर गुळधाने यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी निवड केली आहे. नुकतेच त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. पक्ष संगठन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मान त्यांनी व्यक्त केला आहे.
रामसेतूकडे पोलीस गस्त वाढवावी
चंद्रपूर : येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रामसेतू पुलाकडे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. युवक-युवतींचा मोठा गराडा असतो. अनेकजण सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत असतात. परंतु, येथून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने अपघाताची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
चंद्रपुरातील क्रिष्णनगर येथे वृक्षारोपण
चंद्रपूर : येथील क्रिष्णनगर परिसरातील सरस्वती शिक्षण महिला मंडळाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम छोटू तिघाडे यांच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी कार्यक्रम केंद्राचे प्रमुख घनश्याम कामकार, उपनिरीक्षक सुनंदा कोवे, पूनम बांबोळे, विजय घोडमारे, रवि घोरघाटे, राजेश क्षीरसागर, रंजना आसुटकर, कल्याणी रायपुरे, समीर बोरकर आदी उपस्थित होते.
बसस्थानकाच्या कामाला गती द्यावी
चंद्रपूर : येथील बसस्थानकाचे काम मागील अनेक दिवसांपासून कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे बस लावण्यासाठी बसचालकांना मोठी अडचण होत आहे. याचा फटका प्रवाशांनासुद्धा बसत आहे. कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते. परंतु, बसस्थानकाचे काम संथगतीने सुररू असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.
महागाई कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहे. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कर्ज वितरण मोहीम राबवावी
चंद्रपूर : कोरोनाने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच नोकरभरती बंद आहे. परिणामी अनेकजण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारांसाठी कर्ज वितरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून बेरोजगारांसाठी अनेक मोहीम राबविण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याने त्याचा फायदा मिळत नाही.