सास्ती : राजुरा शहरात सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राजुरा येथील कोविड केअर सेंटरच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या असल्यामुळे पाणी घुसून रुग्णांचे कपडे, गाद्या संपूर्ण ओले झाले. झोपायचे कुठे, असा प्रश्न रुग्णांसमोर पडला आहे.
राजुरा शहरातील समाज कल्याण विभागाच्या आदिवासी वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील समस्यांचा डोंगर उभा असतानाच पुन्हा नवी समस्या उभी झाली आहे. तालुक्यासह शहरात दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कोविड केअर सेंटरच्या खोल्यांमध्ये पाणी घुसले. खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असल्यामुळे व वादळी पाऊस असल्यामुळे अचानक पाणी घुसल्याने येथे असलेल्या रुग्णांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांचे कपडे, बेडवरील गाद्या, चादरी संपूर्ण ओल्या झाल्या. काही कळायच्या आतच पाऊस पडल्याने काहीच करता आले नाही; परंतु आता मात्र त्यांच्या झोपण्याचा व या ठिकाणी राहण्याचा प्रश्न उभा झाला आहे.
पाऊस पडून दोन तास झाल्यानंतरही समस्येवर कोणतीही उपाययोजना झालेली नाही. रुग्ण आपले स्वत:चे चादर, कपडे वाळविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असून त्यांना आराम करण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नसल्याचे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.