मूल : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची कर्मभूमी व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी म्हणून मूल शहर परिचित आहे. मूल नगर परिषद स्थापनेला २७ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, मूल शहराचा कायापालट होऊ शकला नाही, ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. आजच्या स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर या त्रिगुणांची साथ विकासाला लागली, तर मूल शहर ‘स्मार्ट सिटी’ होण्याला कुठलीही अडचण भासणार नाही. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ या उक्तीवादातून मूल शहरवासीयांच्या स्मार्ट सिटीच्या अपेक्षा उंचावल्या असल्याचे दिसून येते.राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल शहरातून राजकीय गणित मांडल्या जातात, असे जाणकार सांगतात. राजकारणाची मुद्दत्त्सेगिरी ज्या शहरातून जोडली गेली ते शहर मात्र विकासापासून कोसोदूर असल्याची भावना नागरिकांच्या मनात आहे. काहीतरी करण्याची तळमळ व प्रयत्नाचा श्वास असला तर, कुठलीही गोष्ट शक्य आहे. मात्र, या शहरात पाडापाडीच्या राजकारणाने विकासापासून दूर ठेवले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार तथा विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय निधीतून १५ कोटी रुपये खर्च करुन शहरातील रस्त्ये कामांचा शुभारंभ केला. कामाला सुरुवात झाल्याने मूल शहराला विकासाची दिशा मिळाल्याचे दिसू लागली आहे. विरोधी पक्षात असताना ना. मुनगंटीवार यांनी मूल शहर विकासाठी निधी खेचून आणला. आजच्या स्थितीत केंद्रात व राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने व तेच मंत्री असल्याने निधीला तसेच विकासाला कुणीही अडवू शकत नाही. मात्र विकासाची तळमळ व काही तरी करण्याची आकांक्षा असेल तरच विकासाचा रथ पुढे जाऊ शकेल, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहराचे नियोजन केले तर मूल शहर स्मार्ट सिटी होण्यास कुणीही रोखू शकत नाही. लोकसभेत याच क्षेत्राचे राज्यमंत्री ना. हंसराज अहीर असल्याने त्यांचीही विकासाला जोड मिळू शकते. मूल शहरात फक्त ५० टक्के कुटुंबाकडे शौचालये आहेत. १०० टक्के कुटुंबाकडे शौचालय होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते व नाल्याची निर्मिती करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी करुन सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कामे करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. नगर परिषदेने काम केले तर नगरसेवक ‘कंत्राटदार’ असल्याने कामाचे तीनतेरा वाजतात हे शहरात फिरल्यानंतर दिसून येते. आवश्यक तेथे बगीचा, दुकान गाळे, शौचालयाची निर्मिती, तंत्रनिकेतन महाविद्यालये, पार्किंगची व्यवस्था, आवश्यक तेथे वृक्षलागवड व त्यांचे संगोपन, स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती, शासकीय कार्यालयाचे आधुनिकीकरण, कर्मचाऱ्यांचा वक्ताशिरपणा, आवश्यक तेथे दिवाबत्ती, क्रीडांगणाची सोय आदी बाबीचा समावेश करुन विकासाला गती दिली तर मूल शहर स्मार्ट सिटीच्या कक्षेत बसण्यास मागे राहणार नाही. मूल शहराचा विकासाला पाठबळ लाभले आहे. त्याचा उपयोग झाला तर विकास अन्यथा ‘अभी नही तो, कभी नही’ ही म्हण सार्थक ठरेल, एवढे मात्र निश्चित! मूल शहराचा पुढे काय कायापालट होईल हे आताच सांगता येणार नसल्याने शहरवासीयांना प्रतीक्षेशिवाय दुसरे पर्याय नाही. आता येणारा काळच सांगेल. (तालुका प्रतिनिधी)
मूल शहरवासीयांच्या ‘स्मार्ट सिटी’साठी अपेक्षा उंचावल्या
By admin | Published: November 26, 2014 11:04 PM