राजुरा : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील राजुरा तालुक्यातील लक्कलकोट येथे राज्यपाल निधीतून राजभवन बांधण्यात आले आहे. मात्र, उद्घाटन झाले नसल्याने ग्रामपंचायतकडे हस्तांतरित केले नाही. परिणामी संबंधित विभागाच्या दुर्लक्षित कारभारात सदर भवन बेवारस पडले आहे.
तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते लक्कलकोट येथे या राजभवनाचे भूमिपूजन करण्यात आले. राज्यपाल निधीअंतर्गत बांधकामही करण्यात आले. परंतु, या भवनाचे केवळ उद्घाटन करण्यात आले नाही म्हणून ग्रामपंचायतकडे हे भवन हस्तांतारित करण्यात आले नाही. दरम्यान, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटनही ठरले होते. परंतु, काही कारणाने उद्घाटन रद्द झाले. त्यानंतर परत उद्घाटनाची तयारी केली तेही रद्द करण्यात आली. त्यामुळे भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत सभोवती झुडपे वाढले असून मोकाट जनावरांचा येथे ठिय्या असताे. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदर भवनाची देखभाल व दुरुस्ती करून उद्घाटन करून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी केली जात आहे.