चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चंद्रपूरचा मुक्कामी दौरा आटोपून मंगळवारी दुपारी ३ वाजता अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. येथून जाण्यापूर्वी मुक्कामी असलेल्या हाॅटेलसमोर कलकम कंपनीत गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये अडकून पडल्याने अडचणीत आलेल्या महिलांनी जोरदार निदर्शने करीत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी ठिय्या दिला. ठाकरे यांनी जाता जाता या महिलांची भेट घेत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. ही समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या आश्वासनाने आंदोलनकर्त्या महिलाही समाधानी झाल्या.
उद्योजकांच्या समस्यांवर मुनगंटीवारांशी चर्चा करणार
राज ठाकरे हे सोमवारी सायंकाळी चंद्रपुरात दाखल झाले. या नंतर रात्री येथे मुक्काम केला. आज सकाळी त्यांनी चंद्रपुरातील वकील, उद्योजक, व्यापारी वर्गासोबत हाॅटेलातच चर्चा केल्यात. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची संख्या अधिक आहे. यापुढे प्रदूषण न करणारे इलेक्ट्रिकल्स, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स पार्क यासारखे उद्योग येणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा उद्योजकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. औष्णिक केद्रे, कोळसा कंपन्या आणि सिमेंट उद्योगांकडून लघू उद्योगांना सहकार्य मिळत नसल्याची बाबही लक्षात आणून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातून उपजीविकेसाठी होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवावे, याकडेही राज ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. हे सर्व विषय प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार आहे. याबाबत जिल्ह्याचे नेते ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगून ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वस्त केले. यावेळी चंद्रपूर एमआयडीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, उपाध्यक्ष प्रदीप बुक्कावार, सचिव राजेंद्र चौबल व उत्तमकुमार डाखरे, संकेत वाघ, रवींद्र सातपुते हे सदस्य उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांचा ‘मनसे’दम
सकाळी ११ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हाॅटेलातच बैठक घेतली. जिल्ह्यात पक्षात काय सुरू आहे. याचा अभ्यास करूनच ते आले होते. यापुढे जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर प्रत्येकांचा भर असला पाहिजे. पक्षकार्याकडे कोणी दुर्लक्ष करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा दमही ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची असलेली प्रतिमा राज ठाकरे यांना अपेक्षित नसल्याची बाब त्यांच्या बोलण्यातून जाणवत असल्याची चर्चा होती. भविष्यात पक्षात मोठे बदल दिसतील, अशी कुजबुज यावेळी कार्यकर्त्यांत होती.