वरोरा (चंद्रपूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सोमवारी सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. येताना वाटेत वरोरा येथे २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी जावून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सुमारे २० मिनिटांच्या या भेटीने राजूरकर कुटुंबीय तर भारावलेच शिवाय राज ठाकरे हे इम्प्रेस झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी रमेश राजूरकर यांना थेट मुंबईला येऊन ‘वन टू वन’ चर्चेचे निमंत्रण देऊन टाकले.
२०१९ ची विधानसभा निवडणूक रमेश राजूरकर यांनी मनसेच्या तिकिटावर लढली. कुणाचेही पाठबळ नसताना राजूरकर यांनी तब्बल ३४ हजार मते घेऊन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. आणि त्यांची दखल मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनाही घ्यावी लागली. राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले. आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर येत असताना सुमारे ५.४५ वाजता त्यांचा ताफा वरोरा येथे पोहोचला. अशातच त्यांनी आपला ताफा रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानाकडे वळविला. दरम्यान, राज ठाकरे आपल्या घरी आले हे पाहून राजूरकर कुटुंबीय भारावून गेले.
राज ठाकरे यांनी सुमारे २० मिनिटे त्यांच्या निवासस्थानी घालविली. दरम्यान, बऱ्याच राजकीय चर्चाही रंगल्या. या भेटीने राज ठाकरेही तेवढेच इम्प्रेस झाले. त्यांनी २०१९ मध्ये राजूरकर यांच्या उमेदवारीला गांभीर्याने घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. परंतु, आगामी काळात असे होणार नाही, असे सांगताच त्यांनी राजूरकर यांना नवरात्रमध्ये मुंबईला वन टू वन मीटिंगसाठी येण्याचे निमंत्रण देत त्यांचा निरोप घेतला. यानंतर ते चंद्रपुरात दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.