चंद्रपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे पाहून राजस्थान सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १५० वाघांची नोंद झाली आहे. वाढत्या वाघांमुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचू लागल्याने अन्य राज्यांच्या मागणीबाबत नॅशनल टायगर कॉन्झव्हेशन ॲथॉरिटी आणि शासनाकडून सकारात्मक विचार सुरू आहे.
राज्यात ३५०पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यापैकी सुमारे १५० वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि ब्रम्हपुरी तालुक्यात आहेत. महाराष्ट्रात वाघांची संख्या आणखी वाढू शकते. ही स्थिती लक्षात घेऊनच अन्य राज्यांनी महाराष्ट्राकडे वाघांची मागणी केली. त्यामध्ये राजस्थान सरकारचा समावेश आहे. चंद्रपूरच्या सीमेला लागून असलेल्या तेलगंणा राज्यात वाघांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्या राज्यातून वाघाची मागणी होऊ शकते, असा अंदाज एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने वर्तविला.
एनटीसीए घेणार अंतिम निर्णय
राजस्थान सरकारसह अन्य राज्यांकडूनही महाराष्ट्राकडे वाघांसाठी मागणी केली जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार नॅशनल टायगर कॉन्झव्हेशन ॲथॉरिटीकडे आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल.