राजुरा : राजुरा तालुक्यामध्ये ज्या गतीने औद्योगिकरण झाले त्याच गतीने प्रदुषणामध्येसुद्धा वाढ झााली आहे. राजुरा परिसरात सीमेंट उद्योग, कोळसा उद्योगामुळे राजुरा तालुक्याचे नावलौकीक झाले. मात्र राजुरा परिसरातील लोकांना प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. राजुरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड अंतर्गत कोळसा खाणीमुळे सास्तीसह परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. कोळशाच्या धुराचे कण परिसरात पसरुन अनेक नागरिकांना त्रास होत आहे. या खाणीमुळे परिसरात उष्णतेमध्येसुद्धा मोठी वाढ झाली आहे. गुप्ता कोल वॉशरीज, आयर्न, कोल वॉशरिजच्या आजूबाजुच्या परिसरातील शेतकरी जल प्रदूषणामुळे त्रस्त झााले. या ठिकाणी कोळसा स्वच्छ धुवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ताो कोळसा थर्मल पॉवर स्टेशनला पाठविला जातो. त्यामुळे विजेच्या उत्पादनातसुद्धा वाढ होत असते. हा कोळसा स्वच्छ करण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा मोठा वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. परिसरातील जनता शांत आहे. जलाचा साठा कमी तर होतच आहे सोबत प्रदूषणामुळे शेतीवर, पिकांवर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. चुनाळा येथील गुप्ता मेटल्स अॅन्ड पॉवर लिमिटेड या कंपनीच्या धुरामुळे चुनाळा, बामनवाडा, राजुरा परिसरातील जनता हैराण झाली आहे. चुनाळा येथे तर काळाकुट्ट धुराचा थर सकाळी गाडीवर, घरांच्या टेबलावर दिसतो. बामनवाडा येथेसुद्धा या प्रदूषणामुळे येथील बालकांवर परिणाम झालेला आहे. या भागात कारखाने आले. पाण्याचा उपसा सुरू झाला. उच्च प्रतिचे लाईमस्टोन भूगर्भातून काढल्या जात आहे. परंतु या भागातील बेरोजगारांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कारखानदार वापरत आहे. यापेक्षा लाजीरवाणी बाब कुठली आहे. या भागातून ओव्हरलोडचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा, सीमेंट वाहतूक होत असून रस्त्यावर कोळसा पडत असल्यामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. या परिसरात नैसर्गिक साधनसामग्रीचा झपाट्यांनी वापर होत असताना प्रदूषणाकरिता योग्य उपाययोजना पुरेपूर होत नसल्याचे चित्र आहे. या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून वेळीच दखल न घेतल्यास याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)
राजुरा परिसर प्रदुषणाच्या विळख्यात
By admin | Published: July 24, 2016 1:02 AM