आनंद भेंडे
फोटो
राजुरा : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे काही मोजक्या लोकांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तालुक्यात अवैद्य धंदे सुरू आहे. यात सामान्य नागरिकांचे खिसे खाली होत आहे तर काहींचे खिसे मात्र भरत आहे. कायद्याचा वचक नसल्यामुळे अवैध धंद्याच्या गैरप्रकार खुलेआम सुरू आहे. यावर अंकुश कोण लावेल, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
राजुरा तालुका आदिवासी व मागासलेला आहे. या तालुक्यात खनिज व कोळसा मुबलक आहे. ग्रामीण भागात शेतीचा मुख्य व्यवसाय आहे. कोळसा खाणी बऱ्याच आहे. कोळसा चोरी मोठ्याप्रमाणावर होत आहे. यावर आळा घालणारे पथक नावालाच आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र ही मंडळी छुप्या पद्धतीने या धंद्यांना बळ देत असल्याचे चित्र आहे.
नाल्यांमधील रेती गायब
वन व राजस्व खात्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नाले आहेत. पावसाळ्यात रेतीचा साठा होतो. अवैधरित्या रेतीचे खनन सुरू आहे. या रेतीचे साठे करून ती बेभाव विक्री केली जात आहे. रेती खननाने राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा, मूर्ती, विहीरगाव, शिरशी, टेंभुरवाही, सुमठाना, रामपूर परिसरातील नाल्यांमधील रेतीच गायब झाली आहे. जंगलात वृक्षतोड झाल्यास पंचनामा करून पीओआर जातो. रेती चोरी गेल्यास त्याचा पीओआर मात्र होत नाही. संगनमताने अवैधरित्या रेती वाहतूक केली जात आहे. खासगी कामासाठी अवाढव्य दरात तस्करांकडून पुरवठा होत आहे. दुसरीकडे शासकीय बांधकाम रेतीअभावी बंद पडली आहे.
राजुरात दारू मुबलक
तालुक्यात खुलेआम अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. पोलिसांनी इमानेइतबारे कर्तव्य बजावल्यास अवैध धंद्यावर आळा बसू शकतो. असामाजिक तत्त्वावर त्यांचा दरारा राहू शकतेा. परंतु येथे पोलीसांच्या संगनमताने अवैध धंदे सुरू आहेत.
कोट
राजुरा-कोरपना तालुक्यात कोंबड बाजार सुरू आहे. यामध्ये जुगार, सट्टा, दारू, कटपत्ता इत्यादी अवैद्य धंदे सुरू आहे. स्थानिक पोलिसांची सर्व या धंद्याला अलिखित परवानगीच दिली आहे. मला देखील असा बाजार भरण्याची परवानगी देण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्रान्वये केली आहे.
- सुरज ठाकरे
जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमान पार्टी, चंद्रपूर.