चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये थेट लढत झाली. या लढतीमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा एकतर्फी विजय झाला. मात्र त्यांच्या विजयाने जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातील नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राज्याचे वजनदार नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव अनेकांना चक्रावणारा ठरला. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. मात्र या सभा मुनगंटीवार यांच्या विजयासाठी प्रभावी ठरू शकल्या नाहीत.
२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. हा पराभव भाजप पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून चंद्रपूर लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने नियोजन केले होते. २०२४ ची लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित होताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मेळावा, कार्यक्रम, सभा आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. एवढेच नाही तर काही विधानसभा क्षेत्रामध्ये अभिनेत्यांचाही रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे सर्व प्रयत्न मुनगंटीवार यांना विजयी करू शकले नाहीत.महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजार ४०६ मतांनी विजयीचंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर तर भारतीय जनता पार्टीकडून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रतिभा धानोरकर यांना ७ लाख १८ हजार ४१० तर सुधीर मुनगंटीवार यांना ४ लाख ५८ हजार ०४ मते मिळाली. यामध्ये २ लाख ६० हजार ४०६ मतांनी धानोरकर विजयी झाल्या.