लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे रमाई घरकूल योजनेचे १३९ अर्ज दोन वर्षांपासून न. प. कार्यालयात धुळखात पडून होते. आता एक महिन्यापूर्वी मंजुरीसाठी ते समाज कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आले असले तरी पाठपुरावा शून्य आहे. आणि इकडे लाभार्थी मात्र आज घर मिळेल, उद्या घर मिळेल या आशेवर आहेत.नागभीड न.प.ने रमाई घरकूल योजनेचे दोन वर्षांपूर्वीच अर्ज मागविले होते. मात्र या अर्जांचा पाठपुरावाच न झाल्याने या योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी या लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.नागभीड न.प.ने रमाई घरकूल योजनेंतर्गत नागभीड न. प. क्षेत्रातील नागरिकांकडून अर्ज मागविले. जवळपास १७४ लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते, अशी माहिती आहे. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जांची छाननी करून अर्जामध्ये काय त्रुटी आहेत याची कल्पना अर्जदारांना देऊन त्या त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे नगर परिषदेचे काम होते. पण न.प.ने अर्ज प्राप्त झाल्यानंतर केवळ अर्जदारांची यादीच समाजकल्याण विभागाकडे पाठविली होतीे. आणि अर्जांचे गठ्ठे नगर परिषदेतच ठेवले. दरम्यान योजनेसंदर्भात लाभार्थ्यांनी नगर परिषदेत येऊन विचारणा सुरू केल्यानंतर ही बाब नगर परिषदेच्या लक्षात आली. या अर्जांची शोधाशोध सुरू झाली. अर्ज मिळाल्यानंतर अतिशय घिसाडघाईत या १७४ अर्जांची छाननी करून यातील १३९ अर्जांची रवानगी समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली. मात्र अर्जामध्ये विविध त्रुट्या असल्याच्या सबबीवरून या कार्यालयाने हे संपूर्ण अर्ज परत पाठविले, अशी माहिती आहे. यानंतर त्रुटयांची दुरूस्ती करून हे अर्ज पुन्हा पाठविण्यात आले असले तरी या अर्जांची स्थिती काय आहे, याची शहानिशा करण्यास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सवड नाही.या योजनेसंदर्भात नागभीड न.प.ने कमालीचा हलगर्जीपणा दाखविला. वेळेवर प्रक्रिया पार पाडली असती तर लाभार्थ्यांना दोन वर्ष वाट पाहावी लागली नसती. नगर परिषदेचे लक्ष्य केवळ सिमेंटच्या रस्ते व नाल्यांकडे आहे. आता तरी न.प.ने पाठपुरावा करावा.- प्रतिक भसीननगरसेवक, न. प. नागभीड
रमाई लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:46 PM