७५०० हेक्टर जमीन होणार सिंचित : इस्राईल देशातील स्कॉडा पद्धतीचा वापर राजकुमार चुनारकर चिमूर चिमूर: देशातील शेती व्यवसाय निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. हाकेवर असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्यापासूनही चिमूर तालुका वंचित आहे. चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या प्रयत्नात असलेले आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नातून आता कर्नाटकातील ‘रामथळ’ उपसा सिंचन प्रणाली चिमूर तालुक्यात येणार आहे. या प्रणालीतून ७ हजार ५०० हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतल्या जाते. या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. चिमूर तालुक्यात सिंचनाचा कोणताच प्रकल्प नसल्याने शेती व्यवसाय निसर्गाच्या दुष्टक्राने डबघाईत आला आहे. या शेतकऱ्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने गोसीखुर्द प्रकल्पातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तालुक्यात गोसीचे पाणी पोहचू शकले नाही. या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी शासन आग्रही असल्याचे शासनाच्या प्रयत्नातून दिसून येत आहे. सिंचनातील पाणी वापराची कार्यक्षमता २० टक्क्यांनी वाढविने व जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिंबक पद्धतीने सुक्ष्म सिंचनाचा अंवलब करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन आग्रही आहे. कर्नाटक राज्याने नुकतेच रामथळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रास ठिंबक सिंचनाने लाभ पोहचविला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठिंबक सिंचानाची योजना राबविणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील गोसीखुर्द प्रकल्पावर ठिंबक सिंचन योजना राबविण्याचा निर्णय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व राज्य सरकारने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या साजा क्र. ३१७५० मीटर वरील वडाळा शाखा कालवा वरील नवेगाव वितरीकेवरील १२०० हेक्टर, सोनेगाव वितरीकेवरील २२०० हेक्टर व पिंपळनेरी लघु कालव्यावरील ७०० हेक्टर व पुष्ठ भागातील जवळपास २००० हेक्टर असे एकूण सहा हजार शंभर हेक्टर त्यासोबत मुख्य कालव्यावरील साजा क्रमांक ४४२०० मी वरील पुच्छ शाखा कालव्यावरील १४०० हेक्टर भागात प्रेशराईज ठिंबक पद्धत वापरुन सिंचन करणे शक्य आहे. या योजनेवर आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याशी चर्चा करुन मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील ७ हजार ५०० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी कर्नाटक राज्यातील रामथळ उपसा सिंचन योजनेच्या धार्तीवर ठिंबक पद्धतीने सुक्ष्म सिंचन करण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कामाकरिता अतिरिक्त दोन उपविभागाची आवश्यकता आहे. त्यापैकी एका उपविभागाला शासनाने मान्यता दिली असून येत्या मे महिन्यात हे उपविभाग नव्याने सुरु होणार आहे. या सूक्ष्मसिंचन योजनेत इस्राईल देशातील स्काडा टेक्निकलचा वापर करण्यात येणार आहे. या योजनेतून चिमूर तालुक्यातील सात हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेसाठी प्रती हेक्टर तीन लाख रुपये इतका खर्च राहणार असून अंदाजे २२५ कोटी रुपये खर्च प्रस्तावीत केला आहे. ही योजना दोन वर्षात पूर्ण करण्याचे प्रयत्न राहणार आहेत. यातून चिमूर तालुक्यात भविष्यात हरितक्रांती होण्यास मदत होणार आहे.
कर्नाटकातील ‘रामथक’ सिंचन प्रणाली चिमूर तालुक्यात
By admin | Published: April 28, 2017 12:52 AM