राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : वाघांच्या पंढरीतील ताडोबाच्या चार प्रवेशद्वारांपैकी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षितपणाने चिमूर तालुक्यातील रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटक जाण्यास प्राधान्य देत नव्हते. मात्र, नुकतेच झरणीच्या तीन बछड्यांच्या आगमनाने या प्रवेशद्वारावर झरणीच्या परिवाराला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. त्यामुळे रामदेगी प्रवेशद्वार हाऊसफुल्ल झाले आहे.
वाघांच्या हमखास दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे, तर ताडोबातील कोअरच्या चार प्रवेशद्वारांपैकी व्यवस्थापन मोहर्ली व कोलारा गेटकडेच सुविधा उपलब्ध करून देते आणि बाकी प्रवेशद्वार उपेक्षित असतात. यामुळेच पर्यटकसुद्धा मोहर्ली व कोलारा गेटवरून ताडोबात जाण्यास पसंती देतात. रामदेगी, खुटवंडा गेटकडे पर्यटक आकर्षित होत नाहीत, अशी खंत रामदेगी, खुटवंडा गेटवरील गाईड, जिप्सी चालक व्यक्त करतात.
रामदेगी गेटवर व्यवस्थापन लक्ष देत नसले तरी वाघ मात्र या परिसरावर जास्त प्रेम करतात. याच गेट परिसरात माया वाघिणीने दोनदा बछड्यांना जन्म दिला. या परिसरातच वास्तव्य केले. मायानंतर मयूरी वाघिणीने, तर आता नुकतीच झरणी वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला. आजघडीला झरणी वाघिणीचा परिवार रामदेगी बफर झोनमध्ये वास्तव्यास आहे. रामदेगी गेटवरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना झरणी आपल्या अनेक मुद्रांचे दर्शन देत आकर्षित करीत आहे. त्यामुळे रामदेगी गेटचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असल्याचे गाईड, चालक सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गाईडने केले झरणीच्या बछड्यांचे स्वागत
चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोनअंतर्गत येणाऱ्या रामदेगी बफर झोनमध्ये तीन महिन्यांपूर्वी झरणी वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला व तीन-चार महिने आपल्या दुधावर वाढवून झरणीने आपल्या तीन बछड्यांना बाहेर काढले. याचे दर्शन रामदेगी गेट परिसरात पर्यटकांना झाले व झरणीच्या परिवाराला आदित्य मांगरोलिया यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. शुक्रवारी सायंकाळी रामदेगी गेटवर गाईड, जिप्सी चालक, पर्यटक व टायगर सेव्हनचे व्यवस्थापक सतीश मानकर, गाईड, पतीराम नेवारे, रामा ननावरे, विकास भोयर यांनी केक कापून व मिठाई वाटून आनंद साजरा केला.