चंद्रपूर : सनातन धर्माचा प्रचार करण्याच्या अनुषंगाने करोली राजस्थान येथील श्री राजगिरी महाराज यांनी गंगोत्री ते रामेश्वर अशी ३,६०० किमीची दंडवत यात्रा सुरू केली आहे. या यात्रेदरम्यान ते रस्त्यावर छोटेसे अंथरून टाकून दंडवत करतात. पुन्हा उठून थोडे समोर अंथरून टाकून दंडवत करत मार्गक्रमण करतात. १४ एप्रिल २०२३ पासून त्यांनी ही दंडवत यात्रा सुरु केली असून, जून-२०२४ पर्यंत रामेश्वर गाठल्यानंतर ते या यात्रेचा समारोप करणार आहेत. शनिवारी २० जानेवारी रोजी ते चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपुरातून त्यांनी दंडवत यात्रा सुरू केली. चंद्रपूर-नागपूर रोडने जात असताना अनेकांनी त्यांचे स्वागत केले. अनेकांनी त्यांचा व्हिडीओ बनवला. तर काहींनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतला.
आपल्याकडे सनातन धर्म असतानाही पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार वाढत असल्याचे बघून राजस्थान येथील श्री राजगिरी महाराज अस्वस्थ झाले. या पाश्चिमात्य संस्कृतीला आळा घालण्यासाठी तसेच सनातन धर्माचा प्रचार करण्याच्या अनुषंगाने त्यांनी गंगोत्री ते रामेश्वर दंडवत यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिल २०२३ रोजी त्यांनी मौनीबाबा आश्रम करोली येथून आपले शिष्य रामनवास गुरजर यांच्यासमवेत यात्रेला सुरुवात केली आहे.दररोज ११ ते १२ किमीचा प्रवास
करोली राजस्थान येथील श्री राजगिरी महाराज दररोज दंडवत घालत ११ ते १२ किमीचा प्रवास करतात. सकाळी ५ ते ६ वाजल्यापासून त्यांच्या दंडवत यात्रेला सुरुवात होते. दुपारच्या वेळेस जेवण, विश्राम केल्यानंतर ते पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. जिथे अंधार पडेल तिथेच ते डेरा टाकून मुक्काम करतात.आश्रमातूनही करतात प्रचार
राजस्थान करोली येथे श्री राजगिरी महाराजांचे आश्रम आहे. येथे अनेकजण वास्तव्यास असतात. या आश्रमातूनही ते सनातन धर्माचा प्रचार करत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.