राजुरा : राजुरा शहराला शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी न. प. राजुराचे फिल्टर प्लांट रामपूर येथे उभारण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या फिल्टर प्लांटचे पाणी राजुरा शहरासाठी नवसंजीवनीचे काम करीत आहे. या फिल्टर प्लांटचे पाणी रामपूरवासीयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी रामपूर येथील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आमदार सुभाष धोटे आणि नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे केली आहे.
सोबतच सास्ती रोड ते फिल्टर प्लांट पर्यंत रोड व नाली बांधकाम करण्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी रामपूरवासीयांना फिल्टर प्लांटचे पाणी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. याप्रसंगी जगदीश बुटले, लक्ष्मी चौधरी, शीतल मालेकर, रत्नाकर गर्गेलवार, प्रभाकर बघेल, कोमल पुसाटे रामपूरच्या सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच हेमलता ताकसाडे, ग्रा. पं. सदस्य जगदिश बुटले, रमेश झाडे, विलास कोदरीपाल, सिंधूबाई लोहे, अनिता आडे, नामदेव गौरकर, बालाजी विधाते उपस्थित होते.