ईदगाहवर विशेष नमाज : मुस्लीम बांधवांनी दिल्या शुभेच्छालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पवित्र रमजान ईदच्या पर्वावर सोमवारी मुस्लीम बांधवांनी स्थानिक ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठन केले. यावेळी मौलानांनी सामाजिक संदेश दिल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील लोकप्रतिनिधींनीही मुस्लीम बांधवांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या.शहरात रमजान ईदनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लीम बांधव नवीन कपडे परिधान करून बगड खिडकी, जनता कॉलेज समोर नागपूर रोड, दुर्गापूर पठाणपूरा गेट बाहेरील ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. तेथे विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी हा विशेष नमाज पठनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रमजान ईदचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सामाजिक संदेश देण्यात आला. चंद्रपुरातील मशिदींमध्येदेखील रमजान ईदनिमित्त विशेष नमाज पठण करण्यात आले.ईदनिमित्त शहरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नमाज पठणानंतर सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे यांच्यासह त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची ईदगाहला भेटपवित्र रमजान ईदच्या पर्वावर शहरातील पठाणपूरा गेट बाहेरील इदगाहवर मुस्लीम बांधवांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी येथील दर्ग्यावर जावून दर्शन घेतले. त्यांच्यासोबत आ. नाना शामकुळे, डॉ. एम.जे. खान, शेख इनायत, इब्राहिम जव्हेरी, रमेश भुते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. विविधतेतून एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून सर्वधर्म समभावाची शिकवण व त्यानुसार आचरण करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य ठरते. एकसंघ राष्ट्र निर्माणात सर्वांचे अमूल्य योगदान लाभले आहे. त्यामुळेच हे राष्ट्र भक्कम बनले असून सर्वांच्या सहकार्यातून या देशाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सारे या पवित्र दिनी एकसंघ होऊ या. राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावण्यास सिद्ध होवू, अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी
By admin | Published: June 27, 2017 12:49 AM