चंद्रपुरात शिवसेना जिल्हा कार्यालय ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल वरोरा नाका चौकापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध जोरदार नारेबाजी करीत निषेध रॅली काढली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले की, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदावर आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे देशात प्रथम क्रमांक पटकाविलेले मुख्यमंत्री म्हणून गौरविण्यात आले, त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असून, महाराष्ट्रातील जनता हे मुळीच खपवून घेणार नाही. नारायण राणे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाप्रमुख गिऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख नीलेश बेळखडे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, कुसुम उद्गार, वर्षा कोटेकर, स्वनिल काशीकर, विनय धोबे, सुमित अग्रवाल, हेमराज बावणे, वसीम शेख, इलियास शेख, सिकंदर खान, सोनू ठाकूर, बाळू भगत आदी उपस्थित होते.
सिंदेवाहीत शिवसेना व युवासेनेची निदर्शने
सिंदेवाही : शहरात शिवसेना व युवासेनेने निदर्शने करून नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याप्रकरणी राणे यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन ठाणेदारांना दिले. यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख आशीष चिंतलवार, शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र मंडलवार, युवासेना तालुका प्रमुख पंकज ननेवार, शहरप्रमुख विकास आदे, ग्रा. पं. सदस्य दुर्वास मंडलवार, शाखाप्रमुख नांदगाव योगेश चांदेकर, शाखा प्रमुख टेकरी कृष्णा मेश्राम, ललीत गुज्जेवार, हर्षल शेरकुरे उपस्थित होते.
गोंडपिपरीतही निषेध
गोंडपिपरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद गोंडपिपरीत उमटले. ठाणेदारामार्फत गृहमंत्रांना पाठविलेल्या निवेदनातून राणे यांना अटक करण्याची मागणीही शिवसैनिकांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने शिवसैनिकच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्यांच्याही भावना दुखावल्या. लाेकप्रतिनिधींनी अशी खालच्या स्तरावर टीका केल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांनी दिला. ना. राणे यांचा जाहीर निषेध करीत अटक करण्याची मागणी ठाणेदार संदीप धोबे यांच्यामार्फत गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निषेध आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडूरवार, शैलेश बैस, तालुका संघटक, अशपाक कुरेशी, विवेक राणा, तुकाराम सातपुते, बळवंत भोयर आदी सहभागी झाले होते.