चंद्रपूर : लोककल्याणाची कळकळ, बुद्धिचातुर्य व उत्कृष्ट प्रशासन कौशल्याने चंद्रपूरच्या गोंड राजवटीत ठसा उमटविणाऱ्या राणी हिराईची जलनीती आजच्या राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र, गोंडकालीन जलधोरणांना कालबाह्य ठरविण्याची कृतघ्न परंपरा सुरूच ठेवल्याने चंद्रपुरातील पिण्याची पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नाही.
चंद्रपूरच्या तत्कालीन गोंड राजसत्तेत २० पेक्षा अधिक राजे होऊन गेले. राणी हिराईचे सर्वोच्च स्थान आहे. प्रजेशी सुसंवाद ठेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राणीने केलेल्या विकासकामांचे स्वरूप इतिहासकारांच्या आकर्षणाचा विषय आहे. राणी हिराईने चंद्रपुरात केलेले विधायक कार्य विशेषत: पाणी प्रश्नाबाबत १६ व्या शतकातील सुधारणा आजही चार पाऊल पुढे असल्याचे दिसून येते. राणी हिराईची दूरदृष्टी
१५ व्या शतकात राजा खांडक्या बल्लाळशाहाने १५८ एकरमध्ये रामाळा तलाव तयार करून चंद्रपूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. राणी हिराईने पती राजा वीरशहा यांच्या हत्येनंतर दत्तकपुत्र रामशहा यास बसवून राणीने राज्य केले. आपल्या कार्यकाळात केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार केला नाही तर अनेक सुंदर वास्तू बांधल्या. जलसंकट दूर केले. रामशहाने तलावाचा विकास केला. रामशहाच्या नावावरूनच ‘रामाळा’ असे नाव झाले. शहरातील बावड्यांचे (विहिरी) स्वरूप तर आजही आधुनिक वाटावे असे आहे. पण, प्रशासनाला त्यांचा सांभाळ करता आला नाही.
‘त्या’ १३ हतनींचे काय झाले ?
रामाळा तलावातून चंद्रपूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी गोंड राजांनी शहरात १३ हतनी (आजच्या भाषेत नळ पाइपलाइन) बांधल्या होत्या. राणी हिराईने या हतनींची उत्तम काळजी घेतली होती. भानापेठ वॉर्ड, रघुवीर बालक मंदिर, अंचलेश्वर वॉर्ड, कस्तुरबा शाळा, जेल सुरक्षाभिंत, सोमेश्वर मंदिर, दादमहल महल वार्ड, कस्तुरबा चौक, गोलबाजार परिसरातील हतनी नष्ट झाल्या. या हतनींच्या विस्तारावरून राणीचा जलदृष्टिकोन प्रतीत होतो.