कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आला. आर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्यात आली. यातून बरेच उत्पन्नही महामंडळाला मिळत आहे. परंतु, एखाद्या डोपोतून मालवाहतूक दुसऱ्या ठिकाणी नेल्यानंतर तेथूनही परतीसाठी मालवाहतूक मिळेल याचा काही नेम नाही. मालवाहतूक मिळेपर्यंत चालकांना त्या ठिकाणीच मुक्काम करावा लागतो. तर बहुतेकदा स्वत:च्या खिशातून पैसे संपवून परत यावे लागते. महामंडळाकडून देण्यात येणारा भत्ता तुटपुंजा आहे. त्यामुळे बहुतेकदा स्वत:च्या खिशातून पैसे संपवून जेवण घ्यावे लागते. जर मालवाहतुकीसाठी गेले नाही तर कारवाई होण्याची भीती असते. त्यामुळे मालवाहतुकीतून महामंडळाला उत्पन्न मिळत असले तरी बहुतेकदा चालकाला फटका बसत असतो.
-----
कोरोनाकाळात एक कोटीची कमाई
-कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. उत्पन्नासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली. साधारणत: मालवाहतुकीतून महामंडळाला १ कोटीच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.
२) चंद्रपूर जिल्ह्यातील चार आगारातून ३० गाड्या नियमित मालवाहतुकीसाठी धावत आहेत.
३) कोरोनामुळे कडक निर्बंध असल्याने एसटी महामंडळाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली असल्याचे सांगितले आहे.
बॉक्स
मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम
डेपोतून एसटीचे चालक माल घेऊन गेल्यास त्यांना परतीच्या मालवाहतुकीची हमी नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरी मालवाहतूक मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागतो. नाहीतर स्वत:च्या खर्चाने परत यावे लागते.
कोरोनामुळे खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बसफेऱ्याही बंद आहेत. तसेच हॉटेल व रेस्टारंटसुद्धा बंद आहेत. त्यामुळे चालकांना मुक्काम करण्याची वेळ आल्यास मोठी फजिती होते. अनेकदा शिळ्या अन्नावर दिवस काढावे लागतात. तर कुठेकुठे जेवणाची व्यवस्था केलेली असते.
बॉक्स
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
एसटी चालक मालवाहतुकीचे ट्रक घेऊन जातात. त्यासाठी त्यांना भत्ता दिला जातो. मात्र हा भत्ता तुटपुंजा असल्याने मोठी अडचण होते. तसेच हा भत्ता वेतनातून कपात केला जात असल्याची माहिती आहे. बऱ्याचदा पगारासोबत भत्ता दिला जाईल, असे सांगितले जाते; परंतु, कोरोनामुळे आता पगारही वेळेवर होत नसल्याने भत्ताही बऱ्याचदा प्रलंबित राहत असतो. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
------
संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
एखादा चालक मालवाहतूक घेऊन गेल्यास त्याला परत मालवाहतूक मिळेलच याची शाश्वती नाही. दुसरी मालवाहतूक होईपर्यंत त्याला तिथेचे थांबावे लागते. किंवा स्वत:च्या खिशातील पैसे संपवून परत यावे लागते. महामंडळाकडून त्याचे परत येण्याचे कुठलेच नियोजन नाही. -दत्ता बावणे, विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
-------
ज्या ठिकाणी माल नेला जातो तेथून परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत गाडी तेथेच ठेवावी लागते. आम्हाला एसटी महामंडळाकडून तुटपुंजा भत्ता दिला जातो. त्यामुळे हाल होतात. वाहतुकीसाठी गेले नाही तर कारवाई करण्याची भीती असते.
संजय सोनकर
विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना